महामार्गावर धुळीचे साम्राज्य
एमएसआरडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष
अपघातांच्या संख्येत वाढ
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली हा राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र हा मार्ग कायम या ना त्या कारणाने चर्चेत व समस्यांच्या गर्तेत दिसून येतो. सध्या मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे दररोज नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, याकडे एमएसआरडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाकण ते पाली, रासळ, वावे, चिवे, परळी, दुधानेवाडी, उंबरे, शेंबडी, मिरकूटवाडी ते पालीफाटा या ठिकाणी धुरळ्याची सर्वात अधिक समस्या आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणारी खडी माती जीवघेणी ठरत आहे. महामार्गावर सर्वत्र धुरळ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. मोटारसायकल स्वारांचे तर धुरळ्यामुळे पुरतेच हाल होत आहेत. या मार्गावरुन जातांना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घातलेली असतांना सुद्धा नाकातोंडात धूळ जाते. तसेच संपूर्ण अंगावर देखील धूळ उडते. वारंवार याचा त्रास होऊन दुचाकीस्वार बेजार झाले आहेत.
याबरोबरच वाहनचालक व प्रवाशी वर्गाच्या नाकातोंडात धुरळा जात असल्याने आजाराला निमंत्रण मिळत आहे. श्वसनाचे विकार असलेल्यासह, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. तर धुरळा उडत असल्याने समोरून येणारी जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघाती घटनांत वाढ झाली आहे. जागोजागी काम सुरू असल्यामुळे वाहने येथून गेल्यास संपूर्ण महामार्ग जणू धुरळ्याचा मार्ग असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. आता ऊन पडून व वाहने जावून येथून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहन चालक, दुचाकिस्वार व प्रवाश्यांना होत आहे. तसेच महामार्गा शेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायीक व रहिवाशी देखील धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. हा धुरळा वाहन चालक आणि प्रवाश्यांच्या अंगावर सर्वत्र बसतो. जणू धुरळ्याने आंघोळच होत आहे.
महामार्गाशेजारी जी दुकाने हॉटेल आणि घरे आहेत त्यांना देखील या धुळीचा खुप त्रास सहन करावा लागतो. वारंवार उडणारी धूळ खाद्य पदार्थ आणि वस्तुंवर देखील बसते त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते. हॉटेल मधील खाद्य पदार्थ दूकानातील व घरातील वस्तु आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात. त्यामुळे या मार्गाचे काम जलद गतीने करण्याची व्यावसायिक, चालक व प्रवाश्यांकडून होत आहे. या मार्गावर पाणी शिंपडण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून जोर धरत आहे.एम. एस. आर. डी. सी प्रशासनाचे खड्डे भरणी व रुंदीकरण काम म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची परिस्थिती आहे. धुरळ्याला रोखण्यासाठी दुपारी व सायंकाळी पाण्याची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून जोर धरत आहे.
- या मार्गावर धुरळ्यामूळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथील धुरळ्याच्या समस्येवर काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. – गणेश कदम, वाहनचालक






