महाबळेश्वर आणि वरंध घाटात पाणी निचरा व्यवस्थेचा बोजवारा
| महाड | प्रतिनिधी |
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणार्या महाबळेश्वर आणि वरंधा या दोन्ही घाटात पक्के नाले नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवस पडलेल्या पावसात ही स्थिती निर्माण होताच प्रशासनाने धावाधाव करत नालेसफाई करत अडत असलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यास सुरुवात केली आहे. वरंध घाटात भोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेली पक्की भिंत यामुळे धोक्यात आली आहे.
वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात भोर आणि महाबळेश्वर सार्वजनिक बांधकामाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर देखभाल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली होती. ही कामे करताना नालेसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. ठिकठिकाणी डोंगरावरून कोसळणारे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. गेली दोन दिवस या दोन्ही घाटात मुसळधार पाऊस पडत आहे. महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत विविध ठिकाणी आलेल्या दरडी काढण्याचे काम जून महिन्यापर्यंत सुरु होते. तर, अनेक ठिकाणी सरंक्षण कठडे उभे करण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या घाटात कोसळणारे धबधबे अनेक ठिकाणी रस्त्यावर आल्याचे चित्र व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर प्रशासन जागे झाले. वरंध घाटात वरंधपासून भोरपर्यंत डोंगर भाग असल्याने मातीचा भाग कोसळून रस्त्यावर येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सतत खोदकाम करुन कामे करत असल्याने माती खाली येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. भोर आणि महाडच्या सीमेवर असलेल्या पवारवाडी आणि इतर गावांच्या जवळ नालेसफाई झाली नाही आणि धबधबे थेट रस्त्यावर आल्याने नव्याने बांधलेली भिंत खचल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
वरंध घाटाप्रमानेच सातारा जिल्हा जोडल्या जाणार्या महाबळेश्वर घाटाचीदेखील गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. जुलै 2021 मधील अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील घाट मार्ग नादुरुस्त झाला होता. या घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दरडी आणि माती हटवण्यात आली नाही. यामुळे महाबळेश्वर हद्दीतील भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. सरंक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नाले सफाई, आदींची कामे आजही अर्धवट अवस्थेत पडून आहेत. महाबळेश्वर भागात दरडींचे प्रमाण मोठे असून, डोंगर उतारावर आलेले दगड, माती हटवण्यास महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाला एक वर्ष लागले त्यामुळे नाल्यात पडलेली माती तशीच ठेवण्यात आली. नाले तुंबून हे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. सध्या दोन्ही घाटात आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असल्याने साचून राहिलेल्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम केले जात आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था दोन्ही घाटात व्यवस्थित नसल्याने हे पाणी साचून राहात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.