शेखाडी पुलाचा कठडा कोसळला

वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन दिवेआगर मार्गावरील शेखाडी ग्रामपंचायत हद्दीतील पूलाचा संरक्षण कठडा काही दिवसापूर्वी कोसळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने शेखाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी पडलेल्या कठड्याच्या जागेवर काठ्या उभ्या करीत साड्या बांधून ठेवल्याने वाहनचालकांना पुढे पूल आहे हे निदर्शनास येते.

तालुका हा समुद्र किनारा व डोंगराळ भागाने व्यापला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी डोंगरावरून खाली येणारे पावसाचे पाणी समुद्राच्या, खाडीच्या दिशेने जावे याकरिता पूल व साकव बांधले आहेत. डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या प्रवाह वेगवान असल्याने पुलाची बांधणी मजबूत तसेच पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दगडी पिलरमध्ये योग्य अंतर ठेवत अथवा सिमेंट पाईपद्वारे पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे.

शेखाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दहा मीटर लांबीचा व चार मीटर रुंदीचा सहा सिमेंट पाईपाद्वारे पूल बांधण्यात आला आहे. पूल वाहतुकीच्या व रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पुलापासून काही अंतरावर जिल्हा परिषद शाळा आहे. एका बाजूला डोंगर असल्याने पावसाळ्यात पाणी याच पुलाखालून समुद्राकडे जाते. पुलापासून साधारणतः पंचवीस ते तीस मीटर अंतरावर समुद्र किनारा आहे. पावसाळी दिवसात अनेक वेळा उधाणाचे पाणी याच पुलाखालून पलीकडे शेतात जाते.

काही कालावधी पूर्वी पूलाचे दोन्ही बाजूंचे कठडे कोसळले. अरूंद पूल त्यातच कठडे नसल्याने मध्यंतरी दोन मिनीडोअर तसेच पर्यटकांचे वाहन पुलावरून खाली पडले होते. परंतु, सुदैवाने जिवितहानी झाली नव्हती. पावसाळी दिवसात डोंगरावरून वेगाने पुलाखालून समुद्राकडे वहात जाणारे पाणी त्याचप्रमाणे समुद्राच्या उधाणाचे पाणी पुलाखालून विरूद्ध दिशेला जात असल्याने शालेय विद्यार्थी, वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही संरक्षण कठडा उभारण्यात न आल्याने शेखाडी येथील ग्रामस्थ विशेषतः महिलांनी त्याच जागी काठ्या उभ्या करुन साड्या बांधून ठेवल्या आहेत.

सद्यस्थितीत पूल तात्पुरती दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

तुषार लुंगे
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन, जि. रायगड

Exit mobile version