नागोठण्यात दुकानाची भिंत कोसळली

| नागोठणे | वार्ताहर |
गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या व पुनर्बांधणी करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागोठण्यातील मटण-चिकन मार्केट इमारतीमधील एका दुकान गाळ्याची अंतर्गत भिंत शुक्रवारी (दि.10) रात्री कोसळली. या दुकानातील कोंबड्या असलेल्या जाळीदार गाडीवर ही भिंत पडल्याने दहा कोंबड्या मृत झाल्या असल्याची माहिती गाळेधारक चिकन विक्रेते मोहम्मद शरिफ अब्दुल कुरेशी यांनी दिली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी या घटनेने मटण-चिकन मार्केटमधील दुकानदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

नागोठण्यातील ही इमारत खूप वर्षे जुनी आहे. या इमारतीत मटण व चिकन विक्रेत्यांचे सुमारे 19 छोटे-छोटे गाळे आहेत. यातील बहुतांश गाळ्यात चिकन-मटण विक्रीची दुकाने आहेत. या विक्रेत्यांकडून ग्रामपंचायत दररोज 20 रुपयांची कर पावती फाडत आहे. तर, याच इमारतीच्या पूर्वेकडील बाजूला ग्रामपंचायतीने येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधले आहेत.

नागोठण्यातील 1989 व 2005 च्या महापुरात ही इमारत पूर्णतः पाण्याखाली गेली होती. त्यानंतर दरवर्षी येथील अंबा नदीला येणाऱ्या पुराचे पाणी या इमारतीच्या पश्चिम बाजूकडे येत असते. त्यामुळे या इमारतीचा पश्चिम बाजूकडील अर्धा भाग दरवर्षी पाण्याखाली जात असतो. त्यामुळेच या इमारतीची पश्चिमेकडील भिंत कमकुवत झाल्याने त्याचा काही भाग याआधी 29 जून 2019 रोजी कोसळला होता. मात्र, असे असले तरी या इमारतीच्या डागडुजीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील विक्रेत्यांकडून होत आहे.

यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा प्रशासक राकेश टेमघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही इमारत खूप जुनी असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी या इमारतीमधील विक्रेत्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात लवकरच एक बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल.

Exit mobile version