आदिवासी विद्यार्थ्यांना दिली मायेची ऊब

भाविका जामघरेची अनोखी समाजसेवा
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळजवळील बिरदोले गावातील महाविद्यालयीन तरुणीने सुरु केलेल्या वीटभट्टीवरील आदिवासी मुलांच्या सुरु असलेल्या शाळेत कर्जतचे व्यापारी किरण परमार यांनी भेट दिली. त्यांच्या माध्यमातून सर्व 33 मुलांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे आणि खाऊचे वाटप त्या ठिकाणी जाऊन केले. आदिवासी मुलांनी पाहुण्यांचे स्वागत एकसाथ नमस्ते आणि टाळ्या वाजवून केले.
नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे या विद्यार्थिनीने दामत येथे असलेल्या आठ वीटभट्टीवर काम करणार्‍या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरु केली आहे. त्या शाळेत शिकणार्‍या मुलांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर कर्जत येथील किरण परमार या व्यापारी वर्गाने व्यावसायिक यांनी संपर्क साधून मुलांना भेटवस्तू, ऊबदार कपडे आणि खाऊ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार किरण परमार यांनी दामत येथे जाऊन वीटभट्टीवर शाळेत शिकतात याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या माध्यमातून पहिली ते सातवीच्या सर्व 33 मुलांना ऊबदार कपडे व खाऊचे वाटप केले. त्यावेळी रायगड भूषण संतोष पेरणे, किशोर गायकवाड आणि भगवान जामघरे हे उपस्थित होते. यावेळी किरण परमार यांनी या मुलांसाठी आणखीन कशाची मदत लागली तर सांगा असे भावना जामघरे यांना सांगितले.

Exit mobile version