पालकमंत्र्यांचे घड्याळ मागेच

कार्यक्रम साडेबाराचा, पोहोचले चार वाजता

| पेण | प्रतिनिधी |

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे केव्हाच वेळेवर येत नाहीत, अशी त्यांची ख्याती असून, याचा अनुभव पेणकरांना गुरुवारी (दि.7) दादर सागरी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान आला. कार्यक्रम पत्रिकेमध्ये कार्यक्रमाची वेळ 12.30 ची दिली होती. मात्र, चार वाजले तरी कार्यक्रमाला सुरूवात झाली नव्हती. त्यामुळे जे सकाळी 11 वाजल्यापासून अधिकाऱ्यांस, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरउन्हात ताटकळत राहावे लागले.

रायगडचे पालकमंत्री उदय सामतं यांच्या घडाळ्याचे काटे मागेच पडत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे-भाजप सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्री पद भूषवणाऱ्या उदय सामंत यांना सध्या वेळेचे भान राहात नसून, अनेकदा निश्चित केलेल्या कार्यक्रमांना ते उशिराने पोहोचत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी आयोजित दादर सागरी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या कार्यक्रमाला ते तब्बल चार तास उशिराने आले. त्यामुळे सकाळपासून उपस्थित विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली होती. तालुक्यातील पोलीस पाटील तर सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यक्रम स्थळी हजर होते.

पालकमंत्र्यांच्या या अधिकाऱ्यांना गृहित धरुन चालण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्या विरोधातील नाराजी आता अधिक वाढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकाऱ्यांनी जनतेची कामे करायची की पालकमंत्र्यांच्या सेवेत आणि त्यांच्या प्रतिक्षेत दिवस वाया घालवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कार्यक्रमाच्या वेळी पेणचे आ. रवीशेठ पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, अधीक्षक अभियंता अनिता परेदशी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात प्रथम भूमीपूजन व कोनशिला पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पोलीस पाटील व अपघातग्रस्तांचा वाली कल्पेश ठाकूर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version