खारेपाटातील ग्रामस्थांचे उपोषण
| पेण | प्रतिनिधी |
पाण्यासाठी खारेपाटातील तरूणाई 7 डिसेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 रोजी आठ दिवस वाशी जगदंबा मंदिर पटांगणावर उपोषणाला बसले होते. त्या दरम्यान, अधिवेशन चालू असल्याने शेकापचे चिटणीस आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. सुनिल शिंदे, आ. अनिकेत तटकरे यांनी खारेपाटातील उपोषणा संदर्भात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष खारेपाट पाणी प्रश्नाकडे वेधले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पाणी खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबर रोजी अश्वासन दिले. या अश्वासनावर उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. परंतु, दिलेला शब्द शासनाने पाळला नाही म्हणून अखेर शनिवार (दि. 24) वाशी येथे जितेंद्र ठाकूर, अजित पाटील, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे आणि नंदा म्हात्रे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, उपोषणकर्त्यांनी 14 डिसेंबर 2023 रोजी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास एक महिन्यात मंजूरी देण्यात येईल हया आमरण उपोषणकर्त्यांना व खारेपाटातील जनतेला अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 11 डिसेंबर 2023 रोजी 25 डिसेंबर 2023 पर्यंत वाशी येथील पाण्याची टाकी भरून त्यातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या प्रस्तावित पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा कालावधी संपूनही योजना पूर्ण न करणार्या अधिकार्यांवर दफ्तर दिरंगाई व कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई करावी, निधी उपलब्ध असूनही प्रस्तावित योजना पूर्ण न करून मूलभूत गरज असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून खारेपाटातील जनतेचा अमानुष छळ करणार्या जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रलंबित योजना पूर्ण करण्याचे कालावधीचे प्रतिज्ञापत्र लिहून दयावे, या मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत या मागण्या पुर्ण होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे उपोषणकर्त्यांकडून प्रसार माध्यमाशी बोलताना सांगण्यात आले.