खारेपाटचा पाणीप्रश्न पेटणार

जगदंबा देवीच्या दारात बेमुदत उपोषण


| पेण | प्रतिनिधी |


पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत पेण-वाशी येथे जगदंबा देवीच्या दारात पाणीप्रश्नावर गुरुवारपासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे. हेटवणे कालव्याच्या पुढील कामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी खारेपाटवासीय एकत्र आले आहेत. या उपोषणाला विविध पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला असल्याने खारेपाटचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, जलसंपदा विभाग हेटवणे मध्यम प्रकल्पाचे दि.26 सप्टेंबर 2023 रोजीच्या जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना सादर केलेल्या सुधारीत चतुर्थ प्रस्तावास जलसंपदा मंत्रालयाच्या कॅबिनेट बैठकीची मंजुरी मिळून योजनेचे पुढील टप्प्यातील कामाचे निविदेचे आदेश होऊन कालव्याचे काम सुरू करावे. हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्धव पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करून खारेपाटातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे. जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था पाणीपुरवठा योजनेचे काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावे. खारेपाटातील शेतकऱ्यांना हक्काचे सिंचनाचे पाणी वितरीत करावे आदी मागण्यांसह उपोषणाला सुरूवात झाली आहे.

उशिरापर्यंत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही. त्यामुळे हे उपोषण नक्कीच चिघळण्याचे चिन्ह दिसत आहे. कारण, उपोषणकर्त्यांनीही पवित्रा घेतला आहे की मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे नाही. एकंदरीत, यामध्ये शासनाचा कस लागणार आहे, असेच काहीसे चित्र दिसत आहे. त्यातच हिवाळी अधिवेशनातदेखील हा कळीचा मुद्दा होऊ शकतो.

Exit mobile version