। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील नवी मुंढाणी येथे बांधण्यात आलेल्या सभा मंडपाबाबत चौकशी करावी या मागणीसाठी मुंढाणी येथील ज्येष्ठ नागरिक केशव कुथे आणि जनार्दन कुथे यांनी बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
पेण तालुक्यातील नवी मुंढाणी येथील हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभा मंडपाबाबत गैरकारभार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज आणि निवेदन संबंधित विभागांना दिले आहेत. वर्षभरापूवी र् जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या आदेशानंतर पेण प्रांताधिका-यांनी बैठक घेऊन चौकशी करण्याचे लेखी आवाहन दिले होते. त्यामुळे त्यावेळीही कुथे यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन स्तरावर ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही चौकशी झालेली नाही. त्यामुळे आता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाचा निर्धार करीत केशव कुथे आणि जनार्दन कुथे या ज्येष्ठ नागरिकांनी 2 फेबु्रवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज 3 फेबु्रवारी रोजी कुथे यांचे बेमुदत उपोषण सुरु होते. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुथे यांना चर्चेसाठी बोलाविले होते. चर्चेनंतर दिलेल्या आश्वासनानंतर कुथे यांनी सदर उपोषण स्थगित केले.