रानसई धरणाची पाणीपातळी खालावली

| उरण | प्रतिनिधी |

मे महिन्यातील वाढत्या तापमानामुळे रानसई धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातून जून अखेरपर्यंत पुरवठा करण्याचे नियोजन एमआयडीसीने केले आहे. रानसई धरणाची पाणीपातळी शुक्रवारी 86 फुटांवर होती. तर गेल्या वर्षी याच दिवशी ही पातळी 96 फूट इतकी होती. मात्र, त्यावेळी मे महिन्यात पावसाने सुरुवात केली होती. मात्र, यावर्षी पाणीपातळी अधिक घटल्याने उरणकरांना पावसाची प्रतीक्षा आहे.

रानसई धरणातील पाणी साठवण क्षमता गेली अनेक वर्षे वाढत नसल्याने उरणच्या नागरिकांवर पाणीकपातीचे संकट वाढू लागले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने या धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्यांचे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे येथील नागरिकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीकपातीचा सामना करावा लागतो. धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात आहे. प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जाते. उरणकरांना दररोज 41 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, एमआयडीसीकडे केवळ 30 दशलक्ष लिटर पाणी असल्याने दररोज 10 दशलक्ष लिटर पाणी कमी पडते. त्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करता यावा यासाठी पाणीकपात केली जाते. गेल्या 60 वर्षांत पाण्याची मागणी वाढली असली तरी रानसई धरणातील पाणीसाठा कमी होत गेला. धरणाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढवावी, गाळ काढावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.

रानसई धरणातील पाणीसाठा 86 फुटांवर आला आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी या पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार 30 जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार आहे. मात्र, या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करून पाणी जपून वापरावे.

ग्यानदेव सोनवणे,
उपअभियंता, एमआयडीसी, उरण


Exit mobile version