| माणगाव । वार्ताहर ।
निजामपूर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्या काळनदीवरील कोशिंबळे धरणातील पाण्याची पातळी मार्च महिन्यातच खालावल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यंदाचे वर्षी पाणी टंचाईचे निजामपूर ग्रामपंचायतीवर संकट उभे असताना या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत व पुरेसा व्हावा. निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत तातडीने जिल्हाधिकारी तसेच खा. सुनील तटकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, माणगाव उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनातून पहूर धरणाचे पाणी काळ नदी पात्रात सोडावे अशी निवेदनातून मागणी केली आहे.
निजामपूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दित चार महसुल गावे व 27 वाडया त्यांची लोकसंख्या सुमारे 16 हजार असुन या गावाला गेली अनेक वर्षापासून कोशिंबळे धरणाच्या पाणी साठयातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु हे धरण 40 वर्षापूर्वी बांधलेले असुन त्यांची सन 2015-16 मध्ये विशेष दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु सिल लेवलच्या खालचे थरातुन मोठया प्रमाणात या धरणाला गळती होत असल्याने पाणी वाहून गेले. हि पाणी योजना धरणाच्या वरील भागात असल्याने पाणी पुरवठा विहिरीत पाणी साठत नाही. पुर्ण क्षमतेने भरलेले हे धरण सदय स्थितीत कोरडे पडले आहे.
दरवर्षी हे धरण कोरडे पडते त्यामुळे निजामपूरला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. येत्या 10 दिवसांत ग्रामपंचायत निजामपूर हद्दीत भिषण पाणी टंचाई उद्भवणार असल्याने उपाय योजना गरजेचे आहे. त्यामुळे निजामपूर ग्रामपंचायतीने पाणी टंचाईपूर्वीच उपाययोजना म्हणून पहूर धरणाचे पाणी काळ नदी पात्रात सोडण्याची मागणी केली आहे.