शाळा, अंगणवाड्यांमधील पाणी समस्या दूर होणार

पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी फेरोसिमेंटच्या पाणी साठवण टाक्या बांधणार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांना पाण्याचा ताण असलेल्या कालावधीमधील पाण्याची समस्या दूर होणार आहे. यासाठी कॅच द रेन या तत्त्वावर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता स्व. मीना ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजने अंतर्गत ज्या शाळा, अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन सुविधा व पाण्याची टाकी नसेल त्या ठिकाणी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पखर्चात 5 ते 10 हजार लिटर पाणी साठवण असलेल्या टाक्या उभारण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधित विभागान दिल्या आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी पाणी प्रत्येक घरी नळ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गाव स्तरावरील सर्व सार्वजनिक संस्था, शाळा, अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्याचे सुरक्षित पाणी पोहोचविणे गरजेचे आहे. सध्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रामध्ये सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यासाठीच्या कामामध्ये जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 3 हजार 193 शाळा असून, यामधील 3 हजार 92 शाळांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात आले आहे. तर 101 शाळांमध्ये नळ कनेक्शन जोडणे बाकी आहे. तर जिल्हयातील 3 हजार 92 अंगणवाड्या असून, त्यापैकी 2 हजार 951 अंगणवाड्यांना नळ कनेक्शन जोडण्यात आले आहे. तर 141 अंगणवाड्यांना नळ कनेक्शन जोडणे बाकी आहे.जल जीवन मिशन शाश्‍वत कार्यात्मक नळ जोडणी देण्यासाठी पाण्याचा ताण असलेल्या कालावधीत कॅच द रेन तत्वावर पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे करीता स्व. मिनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने ज्या शाळा व अंगणवाडी ठिकाणांना नळ कनेक्शन सुविधा, पाण्याची टाकी नसेल त्याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करुन अल्प खर्चात 5 ते 10 हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या फेरोसिमेंटच्या टाक्या जल जीवन मिशन अथवा 15 वा वित्त आयोग किंवा इतर निधीच्या माध्यमातून 8 ते 10 दिवसात पूर्ण करता येऊ शकतील.

सदर तंत्रज्ञानाचा जलवर्धिनी, युसुफ मेहेर अली सेंटर, पेण व अनुभव प्रतिष्ठान, खालापूर यांनी यापूर्वी यशस्वीपणे वापर करुन पाणी साठवण टाक्या बांधलेल्या आहेत. शाळा व अंगणवाडीतील मुलांना सुरक्षित पाणी देणे महत्वाचे आहे; कारण लहान मुले दुषित पाण्यामुळे आजारांना लवकर बळी पडतात व वारंवार होणार्‍या संक्रमणामुळे त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो त्यांची वाढ खुंटते यामुळे 2 ऑक्टोबर 2021 अखेर पर्यंत ज्या शाळा व अंगणवाडी ठिकाणांना नळ कनेक्शन सुविधा, पाण्याची टाकी नसेल त्याठिकाणी फेरोसिमेंटच्या पाऊस पाणी संकलन टाक्या निर्माण कराव्यात अशा सुचना डॉ. किरण पाटील यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिल्या आहेत…

एकूण शाळा – 3193, नळ कनेक्शन जोडणी- 3092, नळ कनेक्शन बाकी- 101

एकूण अंगणवाडी – 2951, नळ कनेक्शन जोडणी- 2951, नळ कनेक्शन बाकी- 141

Exit mobile version