उमटे धरणातील पाणीप्रश्न सुटणार

निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांचा पुढाकार

। रायगड । खास प्रतिनिधी ।
ऐन उन्हाळ्यात अलिबाग तालुक्यातील जनता पाणीप्रश्नावर तापली आहे. उमटे धरणातील गाळ काढण्यात अकार्यक्षम ठरलेले लोकप्रतिनिधी आणि नाकर्त्यां प्रशासनामुळे जनतेवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. या ज्वलंत प्रश्नी तालुक्यातील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. 14) धडक दिली. धरणातील गाळ तातडीने काढणे, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टँकर उपलब्ध करुन देणे यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी पुढाकार घेतला. याबाबतची महत्त्वाची बैठक शिर्के यांनी बुधवारी जिल्हधिकारी कार्यालयात बोलवली आहे. या बैठकीला रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तसेच ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधाऱ्याची तात्काळ डागडुजी करण्याबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसीलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना निवेदन दिले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. तातडीने धरणातील गाळ काढला नाही आणि दुरुस्ती केली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात धरण फुटण्याची भीती ॲड. राकेश पाटील यांनी व्यक्त केली. धरणासाठी 215 कोटी रुपये मंजूर असल्याचे आम्हाला जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येते, मात्र खरच एवढी मोठी रक्कम धरणासाठी खर्च होणार की ठेकेदाराच्या खिशात जाणार, असा प्रश्न ॲड. पाटील यांनी उपस्थित केला. सरकार आणि प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही, तर आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा निवदेनातून दिला आहे.

उमटे धरणाच्या पाण्यावर अलिबाग तालुक्यातील तब्बल 44 गाव आणि 33 आदिवासी वाड्यांतील जनता अवलंबून आहे. आक्षी, नागाव, चौल परिसरात पर्यटनावर आधारित छोटे-मोठे व्यवसाय आहेत. पाणी उपलब्ध झाले नाही, तर पर्यटन व्यवसाय बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या रोजगारावर फार मोठा आघात होत असल्याचे नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी 45 लाख रुपये पाईप लाईनवर खर्च करण्यात आले. मात्र, धरणातील गाळ आधी काढणे गरजेचे होते, असे ॲड. कौस्तुभ पुनकर यांनी शिर्के यांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी नंदेश गावंड, ॲड. मधुकर वाजंत्री, विकास पिंपळे, निखील मयेकर, लवेश नाईक, यतिराज पाटील यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
सुरवातीलाच अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उमटे धरणाच्या पाणीप्रश्नी, तसेच धरणाच्या दुरुस्तीबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत गाळ काढण्याची मागणी केली होती.
उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. त्यामुळे धरणाची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेवर आहे.
धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे 30 दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा करणारे हे एकमेव धरण आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून गाळ काढणे, तसेच धरणाची काही प्रमाणात दुरुस्ती करण्यासाठी तातडीने सरकारकडून तातडीन मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तातडीने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची किती गरज आहे, त्याबाबतही पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय वेंगुर्लेकर यांना दिले आहेत.

संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी

पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. तातडीने धरणातील गाळ काढला नाही आणि दुरुस्ती केली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात धरण फुटण्याची भीती आहे. धरणासाठी 215 कोटी रुपये मंजूर असल्याचे आम्हाला जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येते, मात्र खरच एवढी मोठी रक्कम धरणासाठी खर्च होणार की ठेकेदाराच्या खिशात जाणार?

ॲड. राकेश पाटील

उमटे धरणाच्या पाण्यावर अलिबाग तालुक्यातील तब्बल 44 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांतील जनता अवलंबून आहे. आक्षी, नागाव, चौल परिसरात पर्यटनावर आधारित छोटे-मोठे व्यवसाय आहेत. पाणी उपलब्ध झाले नाही, तर पर्यटन व्यवसाय बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या रोजगारावर फार मोठा आघात होत आहे.

हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव ग्रामपंचायत

Exit mobile version