एकदराकरांचा पाणीप्रश्‍न बिकट

महिन्यातून एकदाच होतोय पाणीपुरवठा
गोमुख संघर्ष कमिटीचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

। मुरूड। प्रतिनिधी।
गेले कित्येक वर्षे एकदरा गावात गोमुख पाडा भागातील ग्रामस्थांना महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुरुड पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. यावेळी गोमुख संघर्ष कमिटीतर्फे गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.

मुरूड तालुक्यातील शहराला लागून असलेल्या एकदरा गावात गेले कित्येक वर्षे महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात एकदरा ग्रामपंचायतीला अनेक वेळा निवेदन देऊन पाणीपुरवठा रोज करावा, अशी विनंती केली. तरी ग्रामपंचायतीने कोणतेही उत्तर दिले नाही. अखेरीस संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सभा आयोजित करुन गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरविले.

गोमुख पाडा भागात सर्व प्रकारच्या समाजाची वस्ती आहे. या भागातील ग्रामस्थांच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. येथील महिलांना रोज सकाळी पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन मुरुड शहरात पाण्यासाठी जावे लागते. पाण्यासाठी टेंपो 350 ते 400 रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर गोमुख पाडा गोमुख संघर्ष कमिटीतर्फे गटविकास अधिकारी व जिल्हा अधिकार्‍यांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एकदरा गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची नवीन योजना मंजूर करण्यात आली असून, त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे. दिवाळीमथ्ये लवकरच कामाला सुरुवात होईल व एकदरा गावातील पाणीप्रश्‍न सुटणार आहे.

Exit mobile version