जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विजेता संघ होणार मालामाल


। लंडन । वृत्तसंस्था ।
अवघ्या जगाचे लक्ष असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) अंतिम सामन्यातील विजेत्या तसेच उपविजेत्या संघासाठी असलेल्या बक्षिसाच्या रक्कमेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच घोषणा केली असून त्यानुसार विजेत्या तसेच उपविजेत्या संघावर कोट्यावधींचा पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला आयसीसीकडून मानाच्या गदेसह 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणेज 11 कोटी 71 लाख 74 हजार इतकी, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87 हजार रुपये इतकी धनराशी बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहे.

अंतिम सामन्याआधी आयसीसीने विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणार्‍या बक्षिसाची घोषणा केली आहे. विजेत्या संघाला 11 कोटी 71 लाख, तर उपविजेत्या संघाला 5 कोटी 85 लाख रुपयांची धनराशी देण्यात येणार आहे. मात्र हा सामना ड्रॉ (अनिर्णीत) झाला किंवा टाय झाला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येणार आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप ही आयसीसीची महत्वाकांक्षी स्पर्धा मानली जाते. गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जात आहे. ज्यात भारत आणि न्यूझीलंडने अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आता कोणता संघ बाजी मारुन कोट्यवधींच्या बक्षीसाचा मानकरी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version