महिला वर्गाची मसाल्यासाठी मिरची खरेदीची लगबग

। तळा । वार्ताहर ।

उन्हाळा सुरू झाला की गृहिणी स्वयंपाकासाठी लागणारा मसाला बनविण्याच्या तयारीला लागतात. तळा तालुक्यातील महिलांचीही घरगुती मसाला बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

यासाठी तळा बाजारपेठेत मसाला बनविण्यासाठी लागणार्‍या शंकेश्‍वरी, बेडगी, गंटूर, तेजालवंगी व रेलीज जातीच्या मिर्ची खरेदीला वेग आला आहे.साधारणतः मार्च ते एप्रिल महिन्यात गृहिणींची मसाला बनविण्याची लगबग सुरू होत असे मात्र ऐन हंगामामध्ये मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरचीची खरेदी करून तिला तीन ते चार वेळा उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धणे, बडीशोप इ.पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. गावाला बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते हे माहीत असल्याने हल्ली मुंबईला राहणारे चाकरमानी देखील गावाला असलेल्या आपल्या नातेवाईकांकडून गावावरूनच मसाला बनवून पाठविण्याचा आग्रह धरतात.

मिरची व लागणार्‍या साहित्यांचे बाजारातील भाव

शंकेश्‍वरी - 140 ते 160 रु.किलो

बेडगी - 160 ते 250 रु.किलो

गंटूर - 160 रु.किलो

रेलीज - 200 रु.किलो

तेजा लवंगी - 200 रु.किलो

मिक्स अक्का गरम मसाला - 300 रु.पाव किलो

इंदोर धणे - 200 ते 220 रु.किलो

साधे धणे - 180 रु.किलो

बडीशोप - 260 रु.किलो.
Exit mobile version