गारंबी मोरीचे काम रखडले

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

पावसाळ्यापूर्वी मुरुड-रोहा मार्गावरील गारंबी रस्त्यावरील मोरीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, हे काम पूर्ण न झाल्याने ज्यावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल त्यावेळी पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे येथील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. मुरुड-रोहा या मुख्य रस्त्यावरील मोरीवर छोटा पूल उभारण्याचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरु करण्यात आले होते. या मोरीवरील पूल पूर्ण झाला असून बाजूच्या भागातील काँक्रिटचे काम अपूर्ण राहिले आहे. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा, अशी जनतेकडून मागणी होत आहे.

मुरुड केळघर मार्गे रोहा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा व कमी अंतराचा असल्याने या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता जागोजागी खड्डेमय झाल्याने लोकांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता नागशेत, गांरबी, पारंगान, धनगरवाडी, गोपाळवट पर्यंत खराब झाला आहे. मागील पावसात मुरुड-केळघर मार्गे रोहा हा रस्ता खचला होता. त्यावेळी एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. तेव्हापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सध्या या रस्त्यावरील शीघ्रे मोरी व गारंबी मोरी यांची कामे पूर्ण न झाल्याने वाहतूक कच्च्या रस्त्यावरून सुरु आहे. परंतु ज्यावेळी मोठा पाऊस येईल त्यावेळी पावसाच्या पाण्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह तयार होऊन कच्च्या रस्त्यावरील वाहतूक सुद्धा बंद होऊ शकते. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरात लवकर या मोर्‍यांची कामे पूर्ण करून रस्ता लवकरात लवकर खुला करावा, अशी जनतेमधून मागणी होत आहे.

Exit mobile version