सुभानराव राणे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी: पंडित पाटील

| अलिबाग | वार्ताहर |
गुरूवर्य सुभानराव राणे सन्मान सोहळा आयोजित करून समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करते. या प्रतिष्ठानच्या कार्याची अनेकांनी प्रेरणा घ्यावी, असे गौरवोदगार माजी आ.पंडित पाटील यांनी काढले, गुरूवर्य सुभानराव राणे यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खा.अरविंद सावंत, राजन पंतबाळेकुंद्री, रंजन पंतबाळेकुंद्री, अभिजित पंतबाळेकुंद्री, डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, सत्यजित पंतबाळेकुंद्री, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, सखाराम पवार, शंकरराव म्हात्रे, महादेवबुवा शहाबाजकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांच्यासह श्रीपंत सांप्रदायातील विविध मान्यवर व गुरूबंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंडित पाटील म्हणाले की आम्ही पाटील परिवारातील सर्वचजण या श्रीदत्त मंदिरात प्रत्येकवेळी नतमस्तक होतो. आमच्या परिवाराचे या श्रीपंत भक्त मंडळासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पंतबाळेकुंद्री या तीर्थक्षेत्राला प्रत्येकाने भेट देऊन तेथील उर्जा घ्यावी अस म्हणत पंडितशेठ पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. खा. सावंत यांनी बोलताना सुभानराव राणेंच्या आठवणींना उजाळा देत प्रेमाचा बाजार सर्वही प्रेमाचा बाजार या प्रमाणे रहावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 27 गुणवंतांचा गुरूवर्य सुभानराव राणे सन्मान पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित राणे यांनी केले. तर निवेदन शैलेंद्र भगत व स्मिता पाटील यांनी केले.

या पुण्यतिथीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी 6 वाजता श्रीदत्तात्रेय सहस्त्रनामावली संपन्न झाली. 8 वाजता प्रेमध्वजारोहण संपन्न झाले. दुपारच्या सत्रात भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर व पंडित अरूणबुवा कारेकर यांचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. सायंकाळी डॉ. संजय भगत यांचे श्रीपंत महाराजांच्या बोधावर प्रवचन संपन्न झाले. हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी आरती अवधूताने पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली.

गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानने समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याची जी परंपरा सुुर ठेवलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. सत्कारमूर्तींनाही या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते.

पंडित पाटील, माजी आमदार
Exit mobile version