सुभानराव राणे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी

माजी आमदार पंडित पाटील यांचे गौरवोद्गार
अलिबाग | वार्ताहर |
पेझारी येथील गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान मागील 24 वर्षांपासून सातत्याने रायगडचे भाग्यविधाते स्व.प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर भरवते. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे गौरवोद्गार माजी आमदार पंडित पाटील यांनी काढले. पेझारीतील गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानच्या वतीने स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जि.प सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर, पं.स माजी उपसभापती अनिल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख दिगंबर राणे, जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी व पंतभक्त गुरूबंधू-भगिनी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात अनेक मंडळे विविध शिबिरे उपक्रम राबवितात मात्र गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान हे गेली 24 वर्ष सातत्याने रक्तदान शिबिर स्व. भाऊंच्या जयंतीनिमित्त आयोजित करते. हे मंडळ श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या सांप्रदायाच प्रचार व प्रसार करण्याचे महत्वाचे कार्य करते.
पंडित पाटील,माजी आमदार

मी देखील श्रीपंत महाराजांची समाधी असलेल्या बाळेकुंद्री (बेळगाव) येथे सातत्याने जातो. गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान हे सर्व कार्यात अग्रेसर असून प्रसिध्दीपासून दूर आहे. या प्रतिष्ठानच्या उपक्रमांची प्रशंसा इतरांनी देखील करण्यासारखी आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक सेवा पुरस्कार 1999 साली सर्वप्रथम मला दिला व माझ्यावतीने हा पुरस्कार माझे वडील स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांनी स्वीकारला असे म्हणत पंडितशेठ पाटील यांनी मंडळाच्या पुढील वर्षी होणार्‍या रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी होणार्‍या 25 व्या रक्तदान शिबिरात आपण मोलाचा वाटा उचलणार असणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांनी म्हटले.
या रक्तदान शिबिरात एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीनानाथ कडू यांनी केले. या रक्तदान शिबिरासाठी खालापूर तालुक्यातील गोहे येथील गुरूबंधूंची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी श्रीपंत महाराजांच्या आरती अवधूताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version