रोह्यातील जिल्हा स्त्री रुग्णालय रखडले

सरकार, प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका

| रायगड | खास प्रतिनिधी |

महिलांना वेळेवर उपचार मिळावेत, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी जिल्ह्यातील रोहा तालुक्यात जिल्हा स्त्री रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वसमावेशक आराखडा अद्याप तयार केला नसल्याने हे काम रखडले आहे. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या स्त्री रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. मात्र, आता सरकार आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका हे रुग्णालय उभारताना बसत आहे. जिल्ह्यामध्ये विविध विकासकामांमुळे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांचे जाळेदेखील मोठ्या संख्येने विखुरले आहे. जलमार्ग, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्गासह स्थानिक पातळीवरील मार्ग विकसित झाले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्याच्या रक्षणासाठी अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालये, 52 प्राथमिक आरोग केंद्र अशा आरोग्याच्या सुविधा आहेत.

याठिकाणी मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात. अशा वेळी महिलांसाठी स्वतंत्र जिल्हा स्त्री रुग्णालय असावे, अशी संकल्पना पुढे आली. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत रायगड जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र जिल्हा स्त्री रुग्णालय मंजूर झाले. रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथील सुमारे पाच एकर जमिनीवर ते उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले. या रुग्णालयात 100 खाटा असणार आहेत. रुग्णालय सुरु झाल्याने जिल्हा सरकारी रुग्णालयासह अन्य रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

मंत्रालय स्तरावर रुग्णालयाबाबत बैठका झाल्या आहेत. परंतु, सरकार आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हे रुग्णालय लालफितीत अडकले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मंत्रालय स्तरावर बैठक झाली होती. स्त्री रुग्णालयासाठी तातीडने आराखडा तयार करुन त्याबाबतच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला या बैठकीत देण्यात आल्या होत्या. या बैठकीत विद्यमान मंत्री आदिती तटकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, सार्वजनिक बांधकाम विभाग रोहाचे उपअभियंता विजय बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेले वास्तुविशारद उपस्थित होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नांदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथील सुमारे पाच एकर जमीन जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी मंजूर झाली आहे. रुग्णालयाच्या इस्टीमेटसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून आल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

– डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
Exit mobile version