मच्छी मार्केटचे काम निधी अभावी रखडले

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरात होत असलेल्या मच्छी मार्केटचे काम हे निधीच्या कमतरतेमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तळा शहरातील कुरुक्कर हॉस्पिटल समोर नवीन मच्छी मार्केटची ईमारत उभी रहात असून सुरुवातीस युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची निधी अभावी हळूहळू गती मंदावली आणि आता गेल्या कित्येक महिन्यांपासून हे मच्छी मार्केटचे काम अर्धवट स्थितीत तश्याच अवस्थेत आहे. या मच्छीमार्केटच्या इमारतीसाठी अंदाजित रक्कम 91 लाख 41 हजार सातशे एवढी असून नगरोथान योजनेच्या माध्यमातून 58 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित रक्कम 33 लाख 41 हजार सातशे रुपये नगरपंचायतीला अद्याप प्राप्त झाले नसल्याने सदर मच्छी मार्केट इमारतीचे काम निधी अभावी रखडले आहे.

तळा बाजारपेठेत बसस्थानकशेजारी असलेल्या जुन्या मच्छी मार्केटमध्ये योग्य सुविधा नसल्याने बहुतांश मच्छी विक्रेते मच्छी विक्रीसाठी बाहेर बसतात व यामुळेच काही दिवसांपूर्वी एसटीची धडक बसून कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे पाच मच्छी विक्रेत्या महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना हक्काची जागा कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच ज्या ठिकाणी हे मच्छी मार्केट होत आहे त्या ठिकाणी नगरपंचायतीचे 12 भुईभाडे गाळेधारक होते व नवीन मच्छीमार्केटच्या इमारतीमध्ये पक्के 18 गाळे बांधण्यात येणार आहेत. मात्र, मच्छी मार्केटच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने या भुईभाडे गाळे धारकांना इतरत्र आपला व्यवसाय करावा लागत आहे. यांसह नगरपंचायतीला या गाळे धारकांकडून मिळणारे उत्पन्न देखील रखडले आहे. उर्वरित निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला असून नागरी सुविधा किंवा वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला की लवकरच मच्छीमार्केट इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version