बेलकडेतील मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे

ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेची मागणी

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा रस्त्यावरील बेलकडे येथे रस्त्यात असणाऱ्या मोरीचे नूतनीकरण संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आले आहे. परंतु, हे काम करताना कामाची गुणवत्ता टिकवून ठेवल्याचे दिसत नाही. ठेकेदाराने त्या ठिकाणी तयार सिमेंटचा मोठा ठोकळा टाकला असून मोरी बांधून पूर्ण केल्याचा आव आणला आहे. या मोरीचे बंधकाम करताना आणलेला सिमेंटचा ठोकळा ठेवण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा पाया न करताच त्या खड्ड्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही मोरी कधीही जमिनीत खचून अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अलिबाग-रोहा रस्त्यावरील चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. अलिबाग ते बेलकडे या परिसरात ठेकेदाराने चार ठिकाणी खोदुन ठेवले असून काम मार्गी लावण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. बेलकडे येथे रस्त्यात असणाऱ्या मोरी काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे चित्र समोर आले आहे. ठेकेदाराने या मोरीचे काम करताना खोदाई करून त्यात थेट चौकोनी गाळा असणारे ठोकळटाकले आहेत. हे ठोकळे खड्ड्यात ठेवताना त्याच्या खाली काँक्रीटीकरणाचा पाया करणे गरजेचे होते; परंतु, ठेकेदाराने ते सिमेंटचे ठोकळे थेट जमिनीवर ठेवले आहेत. हे ठोकळे देखील निकृष्ट दर्जाचे असून ते वजनदार असल्याने मातीत खचून अपघात घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, ठेकदाराने मोरीच्या कामासाठी खोदाई करताना जल वाहिनीचे पाईप तोडल्याने या परिसरातील गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Exit mobile version