नाल्याच्या स्लॅबचे काम चुकीचे


महाडमधील कामास विरोधी पक्षाची हरकत
। महाड । प्रतिनिधी ।
महाड नगर परिषदेतर्फे लायन्स क्लब समोर असणार्‍या ई-टॉयलेट शेजारील नाल्यावर कोणतीही वर्क ऑर्डर न घेता स्लॅबचे काम सुरु केल्याने हे काम थांबवण्यात येऊन त्या कामाची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी विरोधीपक्ष नगर सेवकांकडून नुकत्याच झालेल्या महाड नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत करण्यात आली असल्याची माहिती विरोधीपक्ष नगर सेवकांकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

महाड नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील लायन्स क्लब येथील ई-टॉयलेटच्या बाजुकडील नाल्यावर स्लॅबचे काम सुरु असल्याचे काही दिवसापूर्वी विरोधीपक्ष नगर सेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ या कामाची माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून मागितल्यानंतर या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर न घेता काम सुरु केल्याचे समजले असे. दरम्यान व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्ताला मंजूरी हवी असल्यास लायन्स क्लब येथील नाल्यावर स्लॅब टाकण्यात यावे हे काम वगळावे व रितसर विषय पत्रिकेवर विषय आणून त्यावर चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्ष नगर सेवकांनी केली. त्यावर विरोधी पक्ष व सत्ताधारी नगर सेवक यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर खूप वेळ हा विषय ताणून धरल्यानंतर आपले मत मांडताना अध्यक्षा यांनी त्या कामाची पूर्ण माहिती घेऊन वस्तुस्थितीची पाहणी केली जाईल असे आश्‍वासन दिले. संबंधित ठेकेदारा वर कायदेशीर कारवाईची मागणी विरोधकांनी केली.


अशा प्रकारच्या चुकीच्या कामाला आम्ही कधीही पांठीबा देणार नाही जर आम्हाला आमच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे वेळेत भेटली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार
चेतन पोटफोडे, शिवसेना नगरसेवक

Exit mobile version