| चिरनेर | प्रतिनिधी |
शहरीकरणाच्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक प्रथा आणि सांस्कृतिक वारसा लोप पावत असताना, वशेणी गावचा इतिहास, संस्कृती आणि वेगळेपण जपण्याचे काम वशेणी इतिहास संपादकीय मंडळ करीत आहे. मंडळाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार सरपंच अनामिका म्हात्रे यांनी काढले.
‘जनसेवेतून आनंद’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त वशेणी प्राथमिक शाळेतील स्वर्गीय जगन्नाथ मरू म्हात्रे सभागृहात भजन स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भजनांच्या सुरावटीत वशेणी गाव भक्तिमय झाले. यावेळी सरपंच अनामिका म्हात्रे, पनवेलच्या नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे, कलाशिक्षक केशव म्हाडसे, शिवव्याख्याते धिरेंद्र ठाकूर, कवी संजीव पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शंकर म्हात्रे, उपसरपंच गणेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पाटील, जयंत पाटील, बळीराम म्हात्रे, विश्वास म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी समाज एकसंघ राहावा या उद्देशाने मंडळाची निर्मिती केली असून, ते सातत्याने टिकवून ठेवण्याचे काम कौतुकास्पद आहे. मंडळ सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व्यासपीठ बनले आहे, असे अनामिका म्हात्रे यांनी सांगितले. प्रीती म्हात्रे यांनी भजन स्पर्धेचे कौतुक करताना, भजनांतील अभंग आणि ओव्यांच्या सुरांनी मनाला तृप्त केले. हे स्वर म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींसाठी शब्द-सुरांची इंद्रायणीच असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत परिसरातील 11 भजन मंडळांनी सहभाग घेतला. श्री रामचंद्र भजन मंडळ, मोठीजुई प्रथम, श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ, जांभूळपाडा द्वितीय, तर विठ्ठल रुक्माई भजन मंडळ, कोप्रोली तृतीय ठरले. अमृत कला बालगोपाल मंडळ, उलवे खारकोपर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. जांभूळपाडा मंडळाला पखवाज वादनाचे पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून विद्याधर ठाकूर व भास्कर भोईर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे, डॉ. रवींद्र गावंड, अनंत तांडेल, पुरुषोत्तम पाटील, किशोर म्हात्रे, हरिश्चंद्र ठाकूर, मनोज गावंड, संदेश गावंड, कैलास पाटील, विश्वास पाटील, प्रसाद पाटील, पुरण पाटील, राघव म्हात्रे, रमेश पाटील, गणपत ठाकूर, स्व. डॉ. शरद पाटील, सतीश पाटील, बी.जे. म्हात्रे आणि गणेश खोत यांनी विशेष मेहनत घेतली.
गुणवंतांचा गौरव
जनसेवा पुरस्काराने रवींद्र गावंड, हिराचंद पाटील, संगीता गावंड, युवा नाट्य प्रबोधिनी मंडळ दूरशेत, दर्शन पाटील, दत्तात्रेय म्हात्रे आणि सचिन ठाकूर यांचा गौरव करण्यात आला. विशेष नैपुण्य पुरस्काराने विश्वरूपम कला मंच वशेणी, जीवीत म्हात्रे, सृष्टी पाटील, सृष्टी गावंड, तनवी म्हात्रे आणि सोहनी गावंड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संजना म्हात्रे व दिया दीपक म्हात्रे यांना स्वर्गीय मंजुळा परशुराम म्हात्रे शिष्यवृत्ती देण्यात आली.







