देवदूत यंत्रणेचे कामबंद आंदोलन

। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील कोणत्याही आपत्कालीन स्थितीत सर्वप्रथम मदतीला येणारी एक्सप्रेस वे देवदूत यंत्रणा आहे. महामार्ग पोलीस व सुरक्षा यंत्रणेच्या निर्देशानुसार आयआरबी अंतर्गत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत एकूण 67 जवान दिवस रात्र पाळीनुसार देवदूताचे काम करीत आहेत. मात्र प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने, भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.28) सर्व 67 देवदूतांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एक्सप्रेस वे वरील कोणताही अपघात किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यावर मदतकार्य व आरोग्यविषयक व अन्य साह्य करण्याचे काम देवदूत यंत्रणा करते. ही संपूर्ण यंत्रणा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संपावर असल्याने, अशा स्थितीत एक्सप्रेस वे वर एखादी अपघाताची घटना किंवा अन्य दुर्घटना व आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होणार आहे.

Exit mobile version