अलिबाग येथे कार्यकर्ता बैठक पार
| अलिबाग | प्रतिनिधी |
देशात, राज्यामध्ये राजकारणाची परिस्थिती भयानक आहे. जातीवादीशक्ती डोकेवर काढू लागली आहे. अपयशाला खचून न जाता. बचेंगे तो और भी लढेंगे या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागला, असे आवाहन माजी आ.पंडित पाटील यांनी अलिबाग येथे शेकाप कार्यकर्त्यांना केलेले आहे.
आगामी येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन यंदा (दि.2) पाली येथे होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा भक्तनिवास येथे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (दि.24)अलिबागमधील शेतकरी भवन येथे घेण्यात आली. यावेळी पंडित पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रदीप नाईक, ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, ॲड. सचिन जोशी, वृषाली ठोसर, कुंदा गावंड, तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, जि. प.माजी सदस्य संजय पाटील, पं. स.माजी सभापती प्रमोद ठाकूर, सतिश प्रधान, नागेश कुळकर्णी, शहर चिटणीस अशोक प्रधान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले राजकारण बदलत चालले आहे. या बदलत्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात पडला आहे. सर्वसामान्यांची फार मोठी निराशा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी कामगार पक्षाची तत्वे वेगळी आहेत. श्रमजीवी व कष्टकरी जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे. प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. अनेकांना रोजगार दिला. तिच परंपरा जयंत पाटील यांनी जपली आहे. कार्यकर्ता वैचारिक बैठकीचा असला पाहिजे.
पंडित पाटील, माजी आमदार
मागील निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे खचून न जाता पुन्हा उभे राहून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवायची आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. पक्ष बदलणाऱ्यांना महत्व नसते. पुढे आपलाचा विजय असणार आहे. वर्धापन दिनाला कार्यकर्त्यांंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. गावे, वाड्यांमधून अनेक कार्यकर्त्यांनी येऊन शेकापचे नेते आ. जयंत पाटील व पुरोगामी विचाराचे नेते छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार ऐकायचे आहेत, असे पंडित पाटील म्हणाले.
कार्यकर्त्यांना आवाहन
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात बैठका सुरु केल्या आहेत. अनेक तालुक्यांत बैठका झाल्या आहेत. पाली येथे होणाऱ्या वर्धापन दिनाला सुरुवात दुपारी 2 वाजता होणार आहे. साडेतीन ते चार वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे. अलिबाग-मुरुड-रोहा कडून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पार्कींग व्यवस्था वाकण येथे केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहायचे आहे. वाहतूक कोंडी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांनी केले.