भवानी मातेच्या जयघोषात यात्रेची सांगता

लाखोंची उलाढाल,देव काट्यांचा थरार

| उरण | वार्ताहर |

भवानी माता की जय च्या जयघोषात उरण तालुक्यातील विविध गावांमधील देवींचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल झाली.सर्वच ठिकाणी देव काट्यांचा थरार पहावयास मिळाला.

कोप्रोली गावातील बापदेव, जोगेश्‍वरी आई, जरीमरी माता आणि साई गावातील जागूत भवानी मातेच्या जत्रा उत्सवानी देव काट्यांच्या आकर्षणात वाजत, गाजत गुलाल उधळून बुधवारी ( दि19) करण्यात आली.यावेळी देवीच्या गाभार्‍यासह मंदिराला वेगवेगळ्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या जत्रा उत्सव हा चैत्र महिन्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो.त्यानंतर उरण तालुक्यातील ग्रामदैवतांच्या जत्रा उत्सवाला सुरुवात होते.अशा जत्रा उत्सवाची सांगता ही कोप्रोली गावातील बापदेव, जोगेश्‍वरी आई,जरीमरी माता आणि साई गावातील भवानी मातेच्या जत्रा उत्सवानी धुमधडाक्यात होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पेण तालुक्यातील डोलवी येथील नवसाची देव काठी. अशा प्रकारे चार देवाच्या काट्या नाचत आणल्या जातात.ढोल- ताशाच्या तालावर या रंगीबेरंगी सजलेल्या देव काट्या तरुणाई तसेच ज्येष्ठ मंडळी देखील मोठ्या हौशीने नाचवतात.दोन दिवसीय यात्रेमध्ये परिसरातील हजारो भाविक आप आपल्या कुटुंबासह उपस्थिती दाखवितात.

यावर्षी बुधवार दि19 ते गुरुवार दि20 एप्रिल रोजी जत्रा उत्सव आल्याने मंदिरात आई भवानी मातेच्या व ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी तसेच मंदिराजवळ उभारण्यात येत असलेल्या देव काट्याच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. यात्रेत लहान मुलांची खेळणी असलेले दुकाने, मिठाई बरोबर विविध खाद्यपदार्थाची दुकाने,कपड्यांची दुकाने असल्याने खरेदी करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.त्यामुळे व्यवसायिक सुखावला होता.सायकाळी गाव परिसरात आईची पालखी मिरवणूक काढून जत्रा उत्सवाची सांगता केली जात आहे.या जत्रा व पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

Exit mobile version