प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने स्वतःला पेटवले; ग्रामस्थांचा शव घेण्यास नकार

सरकारी दवाखाना परिसरात तणावग्रस्त वातावरण
। सुधागड-पाली । गौसखान पठाण ।
प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने, पालीतील मधल्या आळीतील इमारतीमध्ये एका तरुणाने स्वतःला पेटवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.29) घडली. दोषींवर कारवाई होईपर्यंत नातेवाईक व ग्रामस्थांनी शव घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री व मंगळवारी सकाळी देखील पाली प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर तणाव निर्माण झाला होता.

प्रणय केशव बडे (वय 24) असे या तरुणाचे नाव असून तो रोहा तालुक्यातील आंबेघर येथील रहिवासी आहे. प्रणय विज्ञान शाखेतील पदवीधर होता. पालीतील प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने तिच्या घरासमोर प्रणयने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर प्रणयला पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यानंतर प्रणयचे नातेवाईक व ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मोठी गर्दी केली. प्रणयच्या मृत्यूला कारणीभूत असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्याशिवाय शव ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी तणावग्रस्त परिस्थिति योग्यरीतीने हाताळली. याबाबत पाली पोलीस स्थानकात आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे हे करीत आहेत.

Exit mobile version