शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या; एकला अटक

मृतदेह कचराकुंडीत टाकून जाळला

। ठाणे । प्रतिनिधी ।

उसने घेतलेले पाचशे रुपये न दिल्याच्या शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. तर, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी मृतदेह कचराकुंडीत टाकून जाळला. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. तर, आणखी एक आरोपी फरार आहे.

भिवंडी तालुक्यातील वडपे गावाच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश तारासिंग जाधव, बारकू आणि त्याचा मित्र देवा हे तिघे भंगार व्यवसाय करत होते. सुरेश याने देवा याच्याकडून पाचशे रुपये उसने घेतले होते. मात्र, तो पैसे देत नसल्याने गुरुवारी (दि. 03) रात्री बारकू आणि देवा यांनी त्याला वडपे गावाच्या हद्दीत नेले आणि मद्य पाजून त्याला मारहाण केली. त्यांनतर देवा याने सुरेशच्या डोक्यात लोखंडी पाइपने प्रहार केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी बारकू आणि देवा यांनी सुरेशचा मृतदेह कचराकुंडीत टाकला आणि त्यावर कचरा टाकून जाळून दिला.

घटनास्थळी मिळालेले पाकिट आणि अन्य वस्तूंवरून मृतदेह सुरेश याचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारकू याला अटक केली आहे. तर, याप्रकरणातील फरार असलेला दुसरा आरोपी देवा याचा शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version