। ठाणे । प्रतिनिधी ।
पंख्याची तार इलेक्ट्रिक बोर्डला लावण्यास विरोध केल्याने एका तरुणाची त्याच्याच मित्राने डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील पडघा भागात समोर आला आहे. सुरेंद्र चौधरी (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रमण सिंह (36) याला अटक केली आहे.
भिवंडी येथील भोईरगाव परिसरात एका गोदामामध्ये सुरेंद्र चौधरी, रमण आणि त्यांच्यासह पाचजण मजूर म्हणून काम करतात. त्यांनाराहण्यासाठी येथील गोदामात एका पत्र्याचे लहान आकाराचे शेड उभारण्यात आले आहे. हे पाचही जण मूळचे राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथील आहेत. मंगळवारी (दि. 18) रात्री जेवल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी जात होते. रात्री 10 वाजताच्या सुमारास रमण सिंह हा येथील इलेक्ट्रीक बोर्डमध्ये पंख्याची तार लावत असताना त्यास सुरेंद्र याने विरोध केला. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यांचा वाद झटापटीपर्यंत गेला होता. त्यानंतर इतर मजूरांनी त्यांच्यामधील वाद सोडविला.
मात्र, काही वेळानंतर रमण सिंह हा त्याठिकाणी आला आणि त्याने शेडमध्ये पडलेली लोखंडी वस्तू घेऊन सुरेंद्रच्या डोक्यात प्रहार केला. यात सुरेंद्र गंभीर जखमी झाला. त्यानंतर मजुरांनी आरडाओरड केला. भरपूर रक्तस्त्राव झाल्याने सुरेंद्र याला उपचारासाठी भिवंडीतील आयजीएम या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रमण याला अटक केली आहे.