। रोहा । जितेंद्र जोशी ।
रोहा शहरातील रायकर पार्कजवळ झालेल्या एका अपघातात संदीप जंगम, रा. भुवनेश्वर याचे निधन झाले आहे. हा इसम दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर असलेल्या खड्डयांमुळे तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी विरुद्ध बाजूने विटा घेऊन जाणार्या एका पिकअपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
शहरातून जाणारा रोहा-कोलाड हा रस्ता सुमारे चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मयत इसम हा कोलाड बाजूकडून रोहा शहरात काही कामानिमित्ताने येत असताना रायकर पार्क कमानी परिसरात आला असताना रस्त्यावरील खड्डे आणि गतिरोधकामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तोल जाऊन तो रस्त्यावर खाली पडला. त्याचवेळी रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे विटांची वाहतूक करणार्या महिंद्रा पिकअप गाडीच्या मागच्या चाकाखाली तो इसम आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
अपघातानंतर या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रस्ता हा आजच्या घडीला रोहा नगरपालिकेच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे. दरवर्षी रोहा शहरातील पाण्याची टाकी ते दमखाडी हा रस्ता पावसाळ्यातच नव्हे तर कायमच नादुरुस्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहा शहरातील या मुख्य रस्त्यावरील खड्डयांमुळे एका कुटुंबाला घरातील कमावत्या व्यक्तीचे प्राण गमवावे लागले असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.