अजित पवारांचा एल्गार
। जळगाव । प्रतिनिधी ।
वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तरूण-तरूणींनी आवाज उठवला पाहिजे. सरकारनेही जनतेला वेड्यात काढू नये. आम्हीही राजकारण केलं आहे. यापेक्षा दुसरा मोठा प्रकल्प राज्यात येणार असे लॉलीपॉप सरकारकडून दाखवले जात आहे. दुसरा प्रकल्प तर आलाच पाहिजे पण हासुद्धा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला पाहिजे, असं वक्तव्य विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. जळगाव येथील सभेत ते बोलत होते.
त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकार गप्प का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. सध्या लम्पीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे पीक वाहून गेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिलंय पण आत्तापर्यंत एकाही शेतकर्याला मदत मिळाली नाही. गाजर दाखवायचे धंदे या सरकारने बंद करावेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्याने सरकारला फटकारलं आहे.