आंधळी कोशींबीर खेळ तग धरून

| अलिबाग | प्रमोद जाधव |

गेली अनेक दशकांपासून खेळला जाणारा खेळ या मोबाईलच्या दुनियेत कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मात्र मोबाईलमध्ये रमणारी तरुणाई आजही या खेळाला पसंती दर्शवित आहे. त्यामुळे सध्या आंधळी कोशींबर खेळ तग धरून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लपंडावासारखा खेळ असणारा आंधळी कोशिंबीर हा परंपरागत खेळ आहे. राजेशाहीच्या काळापासून हा खेळ चालत आहे. एकाचे डोळे कपड्याने बांधून त्याने इतरांना शिवायचे असा हा खेळ, बागेत, घरामध्ये अथवा अंगणामध्ये खेळला जात होता. एक मनोरंजनाचे साधन म्हणून या खेळाकडे पाहिले जात होते. त्यामुळे पुर्वी या खेळाला प्रचंड महत्व होते. या खेळातून एकाग्रतेबरोबरच एक सहलशीलता निर्माण होते. परंतु मोबाईलच्या युगात हा खेळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर असताना मोबाईलमध्ये रमणाई बच्चे कंपनी, तरुणाई हा खेळ आता खेळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील शाळकरी मुले हा खेळ खेळण्यामध्ये मग्न असल्याने हा पारंपारिक खेळ आजही मोबाईलच्या युगात तग धरून आहे. या खेळाचा आनंद बच्चे कंपनी मनमुरादपणे घेत आहेत. त्यामुळे या खेळाला पुन्हा नवसंजीवनी मिळू लागली आहे.

असा हा खेळ
डोळे बांधलेल्या खेळाडूची दिशाभूल करण्यासाठी प्रथम त्याला गोल फिरवणे. त्यानंतर त्याने खेळामध्ये असलेलेल्या इतर खेळाडूंना शिवणे, चाचपून ओळखणे किंवा आवाजावरून ओळखणे असा हा खेळाचा प्रकार आहे. ज्या खेळाडूला पहिले पकडलेले असेल, तो खेळाडू बाद होऊन त्याच्यावर आंधळी कोशिंबीर खेळाचे राज्य दिले जाते. त्यानंतर पुन्हा खेळ नव्याने सुरु होतो.
Exit mobile version