गावागावात रंगतोय बालपणीचा खेळ
| अलिबाग । प्रतिनिधी ।
कॅन्डी क्रश, फ्री फायर या मोबाईल विश्वातील खेळामुळे ग्रामीण भागातील गोट्या खेळाकडे दुर्लक्ष झाले होते. हा खेळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर असताना, हरवलेले बालपण पुन्हा गवसल्याचे चित्र दिसून आले आहे. मोबाईलमधील खेळात रमणारी मुले आता गोट्या या खेळाकडे आकर्षित होऊ लागली आहेत. ग्रामीण भागात आदिवासीवाड्यांसह गावोगावी या खेळाला अधिक पसंती येऊ लागली आहे. लहान मुलांपासून 30 वयोगटातील मुले हा खेळ पूर्वी मोठ्या प्रमाणात खेळत असे. गावे, वाड्यांमध्ये फेरफटका मारल्यावर गल्ली बोळात हा खेळ खेळताना मुले दिसून येत असे. मार्च एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यावर अनेक मुले दुकानांतून गोट्या खरेदी करत, त्यानंतर चार ते पाच मुले एकत्र येऊन गोट्या हा खेळ खेळत असे.
मात्र मोबाईलमुळे या खेळाकडे दुर्लक्ष झाले होते. कॅन्डी क्रश, फ्री फायर, पबजी, जंगली रमी, सब वे सर्फर, टेम्पल रन या ऑनलाईन खेळांना मुलांनी पसंती दर्शविली होती. घरबसल्या खेळ खेळायला मिळत असल्याने उन्हात न जाता, हे मोबाईल खेळ खेळण्यामध्ये मुले रमली होती. गोट्या हा खेळ कालबाह्य झाला होता. मात्र या खेळाला पुन्हा सुगीचे दिवस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शाळांची परीक्षा संपली आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. हा खेळ शारिरीक व मानसिक संतूलन स्थिर ठेवण्यामध्ये मदत करत आहे. त्यामुळे गावागावात गोट्यांचा खेळ पुन्हा रंगू लागला आहे. सकाळी अथवा संध्याकाळी अनेक गावांतील शाळकरी व कॉलेजमधील मुले गोट्यांचा खेळ खेळत असल्याचे चित्र आहे.