कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वाहन वितरण
| अलिबाग | वार्ताहर |
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळावी, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेकडून 12 तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) नवीन चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही महत्त्वाची भेट देण्यात आली असून, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) अलिबाग येथील कुंटे बागेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात वाहन वितरण कार्यक्रम पार पडला.
उरण, कर्जत आणि तळा हे तीन तालुके वगळता उर्वरित 12 तालुक्यांतील पंचायत समितीच्या बीडीओंकडे असलेली शासकीय वाहने कालबाह्य झाल्याने ती निष्कासित करण्यात आली होती. परिणामी बीडीओंना दौऱ्यांसाठी भाड्याच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे कामकाजात अडथळे येत असल्याने जिल्हा परिषदेने नवीन चारचाकी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून (डेप्रिसिएशन फंड) एकूण 12 नवीन चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली असून, यासाठी सुमारे 1 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या वाहनांमुळे तालुकास्तरावरील विकासकामांचा आढावा, ग्रामीण भागातील पाहणी, योजनांची अंमलबजावणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे. वाहन वितरणप्रसंगी कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी नारळ फोडून औपचारिक उद्घाटन करत वाहनांच्या चाव्या चालकांच्या स्वाधीन केल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित बीडीओ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन वाहनांमुळे बीडीओंच्या कामकाजात गतिमानता येऊन ग्रामीण विकासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







