नाट्यरसिकांच्या अपेक्षांवर विरजण; आठ वर्षांची प्रतीक्षा अद्याप कायम
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देणारे, बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित नाट्यगृह आजही निधीअभावी अपूर्ण अवस्थेत उभे आहे. गेली आठ वर्षे हे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे माणगावसह परिसरातील नाट्यरसिक, कलाकार आणि सांस्कृतिक चळवळीशी जोडलेले घटक प्रचंड निराशा आणि संताप व्यक्त करत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे.
सोमवार दि.8 जानेवारी 2018 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या नाट्यगृहाचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरुवातीला काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने काम वेगाने सुरू झाले. मात्र मंजूर निधीपेक्षा अधिक काम झाल्याने पुढील टप्प्यासाठी निधीची गरज भासू लागली. निधी लवकरच मिळेल, या आशेवर ठेकेदारांनी काम सुरू ठेवले; परंतु, कालांतराने ही आशा फोल ठरली.
हे अत्याधुनिक नाट्यगृह जुने माणगाव येथील शासकीय विश्रामगृहासमोरील शासनाच्या सुमारे दोन एकर जागेवर उभारण्यात येत आहे. सुमारे 700 प्रेक्षकांची आसन क्षमता, आधुनिक प्रकाश व ध्वनी व्यवस्था, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा तसेच मोठ्या वाहनतळाची व्यवस्था या नाट्यगृहात प्रस्तावित आहे. हे काम पूर्ण झाले असते तर हे नाट्यगृह माणगावच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरले असते. माणगाव शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व नाट्य कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नाट्यगृह असावे, हे स्वप्न स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांनी पाहिले होते. त्यांच्या या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यातूनच या नाट्यगृहास मान्यता व मंजुरी मिळाली. मात्र आवश्यक निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने शासनाची अनास्था उघडकीस येत असून, आज हे स्वप्न अपूर्ण अवस्थेतच अडकून पडले आहे.
दरम्यान, या संदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका मांडत, “माणगावच्या या नाट्यगृहासाठी लवकरच संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे नाट्यगृह पूर्ण होऊन माणगावातील नाट्यरसिकांचे स्वप्न तसेच स्वर्गीय अशोकदादा साबळे यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल,” अशी ग्वाही दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात निधी कधी मिळणार आणि हे नाट्यगृह कधी पूर्ण होणार, याकडे आज संपूर्ण माणगावकरांचे लक्ष लागले आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करण्याची संधी हातातून निसटू नये, हीच अपेक्षा आज प्रत्येक नाट्यरसिक व्यक्त करत आहे.
पूर्णत्वासाठी वाढीव निधीची गरज
आठ वर्षांच्या कालावधीत बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे आज या नाट्यगृहाच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधी अत्यावश्यक झाला आहे. निधी न मिळाल्याने सध्या हे काम पूर्णतः थांबविण्यात आले आहे. अपूर्ण बांधकाम माणगावच्या सांस्कृतिक उदासीनतेचे प्रतीक बनत चालले आहे.







