कळंबजवळ बॅटरी कंपनीत चोरी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील मिरचुल वाडी गावाच्या हद्दीत दानिश इमरान शेख बॅटरी कंपनी आहे. या कंपनीमधील साहित्याची चोरी झाली असून, त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.24 ते 25 दरम्यान कर्जत मुरबाड रोडवरील दानिश इमरान शेख यांचे रॉयल बॅटरी नावाच्या कंपनीतून साहित्याची चोरी झाली आहे. या कंपनीमध्ये कामाला असलेले सादिक मुश्ताक बुबेरे हे दि.25 रोजी सकाळी कामावर गेले असता त्यांना कंपनीमधून साहित्याची चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बुबेरे यांनी तात्काळ कंपनीचे मालक दानिश शेख यांना संपर्क साधला. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब पिट पोस्टमध्ये जाऊन सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीतून चोरट्यांनी बॅटरी बनविण्याचे साहित्य, लोखंडी पत्रे, पाईप, जाळी, कंटेनर असे एक लाख नऊ हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. त्याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. किसवे हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version