पेणकरांना कानोकान खबर नाही
| पेण | प्रतिनिधी |
पेण नगरपालिकेने स्वतःच्या मालकीची लाखो रुपयांचा निधी वापरून साई भक्तांच्या श्रध्देचा विचार करून साई मंदिर बांधले. परंतु, काही साई बाबांच्या भक्ताचा मुखवटा घालून फिरणाऱ्या मंडळीने बांधकामापासूनच विरोध केला आणि आपणच मंदिराचे पालनहार आहोत, असा बोभाटा केला. तेव्हापासून वेळोवेळी नगरपालिकेने या मंडळींना लेखी आणि तोंडी सूचना दिली. परंतु, स्वतःला साईभक्त म्हणणाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. गुरूपौर्णिमेच्या दिवशी तर चक्क पैसे वसूल करायला डिसुजा नामक व्यक्ती बसला होता. जेव्हा नगरपालिकेला ही बाब समजली, तेव्हा नगरपालिकेने या सर्व बाबी बंद केल्या. मात्र, या साईभक्तांच्या बेजबाबदारपणामुळे रविवार, दि. 20 जुलै रोजी साई मंदिरामधून 20 हजार रू. किमतीची एक पितळेची समई अंदाजे 5.50 फुटांची, 10 हजार रू. किमतीच्या दोन पितळेच्या घंटा अंदाजे प्रत्येकी 10 किलो वजनाची चोरीस गेल्याची खबर गणेश जांभळे यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, साई मंदिर हे नगरपालिकेच्या मालकीचे असल्याने नगरपालिकेने ही तक्रार देणे गरजेचे होते. परंतु, गणेश जांभळे यांनी दिलेली तक्रार आश्चर्यकारक होती.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांनी सांगितले आहे की, पोलीस अधिकची चौकशी करत आहेत. लवकरच चोर हातात येईल. मात्र, एक गोष्ट निश्चित, मंदिर हे नगरपालिकेच्या मालकीचे असताना इतर मंडळी स्वतःचा अधिकार गाजवतात, यावर नगरपालिका प्रशासनाने टाच आणणे गरजेचे आहे. आणि साई मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहेत. याबाबत मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले की, साई भक्तांच्या श्रद्धेचा आदर करुन आपण मंदीराचे सर्वस्व आधिकार आपल्या हातात घेतले नव्हते. पण, यापुढे सर्व अधिकार हे नगरपालिका प्रशासनाचे असतील, असे सांगितले. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिकचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर आरोपी पोलीसांच्या ताब्यात येईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
