। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे जवळपास 5 कोटी रुपये किंमतीच्या सुपारी व मिरीच्या मालाची तेथील सुरक्षा रक्षकांना धमकावून अज्ञात टोळीने चोरी केल्याची घटना घडली आहे.
आशेरा वेअर हाऊस शिरढोण येथील आलसेन शिपींग अॅण्ड लॉजिस्टीक्स प्रा.लि. कंपनीच्या गाळ्यामध्ये कस्ट विभागाकडून कस्टम ड्युटी न भरलेला तीन कंपनींच्या सुपारी व मिरी असा माल ठेवण्यात आला होता. दरम्यान, या ठिकाणी 1 ट्रेलर कंटेनरसह 4 लहान ट्रक व सुमारे 30 ते 35 इसम तेथे आले होते. त्यातील एकाने तेथील सुरक्षा रक्षकांला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे हातपाय बांधले. तसेच, कटर मशिनच्या सहाय्याने गाळ्याच्या शटरला असलेली कुलूपे तोडून आत प्रवेश करून जवळपास 5 कोटी रुपये किंमतीच्या सुपारी व मिरी हा माल व सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरुन ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू आहे.







