| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरान मधील इंदिरानगर परिसरातील रस्त्यालगत असेलेले महेंद्र जाबरे यांचे साई कृपा जनरल स्टोअर्स येथे चोरीची घटना घडली आहे. या ठिकाणी चोरट्यांनी धाडसी चोरी करून रोख रकमेसह दुकानातील सिगारेटची पॉकीट व इतर सामान मिळून एकंदरित 25 हजार पेक्षा जास्त ऐवज लंपास केला आहे. ही शुक्रवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास घडली असून माथेरान मधील ही दुसरी चोरीची घटना आहे. वर्षाभरापूर्वी देखील अशीच चोरीची घटना घडली होती. मात्र, त्याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यातच ही दुसरी घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीसांनी श्वान पथक आणले होते. परंतु, हे श्वान पथक देखील चोराचा मागोवा घेऊ शकले नाही. ही चोरी माहीतगार चोरा कडूनच झाली असून या घटनेमुळे माथेरानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास माथेरान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय ए.एम. सोनवणे यांच्या मार्गदर्शनखाली गणेश गिरी करत आहेत.







