| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील सराफ दुकानात अंगठी खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींनी चोरी केल्याची घटना घडली आहे.
सराफ व्यावसायिकाने याबाबतची तक्रार पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला. न्यू गोल्ड पॅलेस या दुकानात एक महिला व पुरुष सोन्याचे दागिने घेण्यासाठी आले होते. त्यांनी अनेक दागिने खरेदी करण्यासाठी पाहीले. मात्र, दागिने पसंत न पडल्याचा बहाणा करुन संबंधित जोडपे तेथून निघून गेले. काही दिवसाने सराफाने दुकानातील दागिन्यांचा तपशील पाहिल्यावर त्यांना दोन अंगठ्या चोरी झाल्याचे समजले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात सराफाने 60 हजार रुपयांच्या दोन अंगठ्या चोरी केल्याची तक्रार नोंदवली.






