| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-सोंडेपार गावातील वातावरणाला 29 जुलैच्या सायंकाळी एका धक्कादायक घरफोडीने हादरा दिला आहे. आरती अनंत काटवी यांच्या ताब्यातील हे घर असून ते अज्ञात चोरट्याच्या निशाण्यावर होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने पाळत ठेवत योग्य संधी साधली आणि घरात प्रवेश केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेवदंडा पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्याने सर्वप्रथम किचनची लाकडी झडप उघडली. खिडकीवरील लोखंडी गज जबरदस्तीने वाकवून आत शिरल्यानंतर त्याने घराचा मागचा दरवाजा उघडला. घराच्या आतील खोलीत मोठ्या आकाराची जुनी, पुरातन न वापरती तांबे व पितळेची भांडी चोरून नेण्यात आली. या घटनेनंतर आरती काटवी यांनी तात्काळ रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी हा प्रकार अदखलपात्र असल्याने आरती यांना प्रभारी न्यायालयातून दाद मागण्याची सूचना दिली आहे. पुढील चौकशी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लोहार करत आहेत.
या घटनेमुळे बंद घरे, विशेषतः गावातील जुन्या वास्तू आणि पुरातन वस्तूंवर चोरट्यांची नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी रात्रीची गस्त वाढविणे आणि पोलिसांच्या गस्त पथकांनी वारंवार हजेरी लावणे याची मागणी केली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक गंभीर प्रकरणांवर तात्काळ कारवाई करून त्यांनी कठोर पोलिसिंगची छाप निर्माण केली आहे. मात्र, चौलसारख्या गावांतील अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अजूनही अधिक काटेकोर उपाययोजना राबवण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.







