कशेडी घाटात चोरी! मोटारसायकलसह मोबाईल, रोकड लंपास

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी घाटातून तीव्र उतारालगत असलेल्या सडवली ग्रामपंचायत हद्दीतील लोकवस्तीमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एका घराबाहेरील मोटारसायकल, घरातील मोबाईल व रोख रक्कम तसेच बँकेचे पासबुक, आधारकार्ड आदी कागदपत्रांचीही चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बांधकाम व्यवसाय करणारे रोहिदास सदाशिव मोहिते यांच्या घरासमोरील हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल लालकाळ्या रंगाची, किंमत सुमारे 25 हजार तसेच 500 रूपयांच्या आठ नोटा असे 4 हजार रूपये, महाड अर्बन बँकेचे पासबुक, आधारकार्ड आदी कागदपत्रे, एमआय कंपनीचा 8 हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन व एअरटेल सीम, असा ऐवज कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्वत:च्या फायद्याकरीता घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश करून चोरून नेला.

सोमवारी पहाटे घडलेल्या या चोरीप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत नटे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version