। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील जय भारत नाका येथील रोनक झेरॉक्सच्या खाली असलेले दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दुकान मालकांच्या माहितीनुसार ही चोरी दुसऱ्यांदा झाली असून, यावेळी चोरट्यांनी शटर उचलून आत प्रवेश केला. दुकानातील काही रोख रक्कम तसेच टॅब चोरीस गेल्याचे सांगण्यात आले आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोराचा चेहरा स्पष्टपणे कैद झाला असून, त्या आधारे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास येताच दुकान मालकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या परिसरात यापूर्वीही चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






