| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत जोडणी करून लाखो लिटर पाण्याची चोरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याचे समोर आले होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्याने आता पुन्हा नव्याने अनधिकृत जोडणी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. मोरबे धरणाची जलवाहिनी विचुंबे ग्रामपंचायत हद्दीतून जात असल्याने 2007 मध्ये नवी मुंबई महापालिकेकडून ग्रामपंचायतीला 700 युनिट पाणी अधिकृतपणे देण्यात आले होते. वाढत्या मागणीमुळे 2014 मध्ये ही क्षमता 1400 युनिटपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, वाढत्या शहरीकरणांच्या नावाखाली स्थानिक पातळीवर जलवाहिनीवर बेकायदेशीर जोडण्या करून तब्बल 1 लाख युनिटपर्यंत पाण्याचा उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाणीचोरीचा परिणाम नवी मुंबईतील पाणीपुरवठ्यावर होत असतानाही पालिका प्रशासनाने कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.







