| उरण | वार्ताहर |
जेएनपीटी चौथा पोर्टजवळ बंदराचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. या बंदराच्या कामासाठी मोठ मोठी सामुग्री म्हणजेच सेंट्रिंग प्लेट, आयएसएमबी प्लेट, यू जॅक, आयएसएमसी चॅनल, लोखंडी प्लेट, लोखंडी चॅनल, लोखंडी मुंडे, इतर धातूच्या वस्तू आणण्यात आले आहे. परंतु या साहित्यांची बंदरातून लाखोंची चोरी झाल्याची घटना समोर आल्याने मोरा येथे चोरीचा गोरखधंदा चालू असल्याचे उघड होत आहे. बोरी नाक्यावर खारफुटीवर भराव करून भंगारमाफियांनी बस्तान बसविले आहे.
उरण मोरा बंदरापासून काही अंतरावर या जेएनपीटी बंदराचे काम चालू आहे. याठिकाणी स्थानिक मच्छिमार मच्छिमारी करण्यासाठी वावरत असतात. या बंदराचा कामामुळे कुठल्याही मच्छिमाराला दुखापत होऊ नये म्हणून या ठिकाणी येण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा याठिकाणांतून लाखोंच्या लोखंडी वस्तू चोरीला जात आहेत.
बोरी स्मशानभूमीजवळ असलेल्या खाडीतील खारफुटीवर भराव करून ती काही भूमाफियांनी परप्रांतीय भंगारवाल्यांना भाड्यांनी दिली आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. जवळच खाडी असल्याने बंदरातून रात्रीच्यावेळी हा चोरीचा गोरखधंदा सुरू आहे. याची माहिती पोलिसांना नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत मोरा सागरी पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पोलीस तपास चालू आहे.