। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पत्रकारांनी नेहमी नाण्याची दुसरी बाजूदेखील पाहिली पाहिजे, अशी तत्त्वे जर जपली नाहीत, तर पत्रकारांच्या बाबतीत असलेला आदरभाव बदलत्या काळात नष्ट होईल, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी दिला आहे. बुधवारी (दि.5) महाड पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाड पत्रकार संघ यांच्यामार्फत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विचारपीठावर महाडचे वन क्षेत्रपाल राकेश साहू, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या मनीषा नगरकर, राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमधाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हेमंत देसाई यांनी महाडच्या ऐतिहासिक भूमीचा उल्लेख करत काळकर्ते शि.म. परांजपे, दत्तो वामन पोतदार, नानासाहेब पुरोहित, मोहन धारिया, यशवंत टिपणीस यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा उल्लेख महाड ऐतिहासिक भूमीला लाभलेले हे खरे हिरे होते असा केला. तर, ज्यांनी लिहिणे अपेक्षित आहे ते लिहीत नाहीत आणि ज्यांना वाचायला पाहिजे ते वाचत नाहीत, ही आजची तरुणाईची अवस्था असून, मोबाईल संस्कृतीवर त्यांनी भाष्य केले. पत्रकारांची होणारी ससेहोलपट थांबवायची असेल, तर समाजानेदेखील पत्रकारांना चांगले स्थान दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.