। लाहोर । वृत्तसंस्था ।
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानशध्ये आयोजित केली जाणार आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला तयार नाही. यामुळे यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेल अंतर्गत केले जाऊ शकते. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, सुरक्षेबाबत काही अडचण आली तर पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार बासित अलीने पाकिस्तानला इशारा दिला आहे. तो म्हणाला, ‘आम्हाला सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घ्यावी लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसोबत मालिकेचे वेळापत्रक आहे. मात्र, या कालावधीत कोणतीही घटना घडल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार नाही. बलुचिस्तान आणि पेशावरमध्ये आमचे जवान शहीद होत आहेत. असे का होत आहे याचे उत्तर सरकारनं द्यावे.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानकडे असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक माजी भारतीय दिग्गजांनी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाऊ नका असा सल्ला दिला आहे. यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.