वाहन चालवताना करावी लागतेय कसरत; मोठा अपघात होण्याची शक्यता
| बांधण | प्रतिनिधी |
अलिबाग-पेण रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. विकासाची गोडगोड आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संबंधित प्रशासनाला याबाबत काहीच देणे-घेणे नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अलिबाग-पेण मार्गावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पर्यटनासाठी अलिबागसह अन्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनादेखील या खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णांनादेखील या खड्डयाचा त्रास होत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये गणरायाचे आगमन होणार आहे. या खड्ड्यातून बाप्पाचे स्वागत होणार आहे. त्यामुळे भाविकांसह नागरिकांमध्ये प्रशासन व सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अलिबागमधील अनेक नागरिक हे गणरायाची मूर्ती पेणमधून आणतात. मात्र, अशा खड्डेमय रस्त्यातून गणरायाला घरी आणायाचे कसे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूकही धीम्या गतीने होत आहे. रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहनचालकांना प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. मुळात, हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे, हेच शासनाला माहिती नाही. सर्वच विभाग याबाबत टोलवाटोलवी करत आले आहेत. अलिबागमधील पोयनाड, कार्लेखिंड, तिनवीरा, तळवली, वाडगाव, पिंपळभाट, बायपास रोड येथे तर एक ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन वाहन चालवायचे कसे, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.





