। पनवेल । वार्ताहर ।
सुनियोजित शहर असलेल्या खारघरमध्ये सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 20 दिवसांत शहरातील विविध भागांत सायकली, महागड्या चप्पल चोरीचे प्रकार होत असून भुरट्या चोरांच्या या कारनाम्यांमुळे रहिवासी त्रस्त आहेत.
खारघरमधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटी, सेक्टर 18 मधील इनपुट पॅराडाईस, रजत ज्योत, जितेंद्र टॉवर आणि सॉलिस्टर सोसायटीत भरदिवसा दोन सायकली चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला; तर खारघरच्या सेक्टर 34 मधील साई मिरॅकल सोसायटी शिरलेल्या चोरट्यांनी ब्लू क्रेस्ट, फॉर्च्युन स्प्रिंग सोसायटीत प्रवेश करून महागडे बूट चोरले आहेत. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी चोर सोसायट्यांच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तसेच शहरातील विविध भागांत हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांनी भुरट्या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कारवाईबाबत पोलिस उदासीन
सेक्टर 35 परिसरातही अशाच पद्धतीने तीन दिवसात तीन सायकल पळवण्यात आल्या होत्या. या वेळी सुरक्षा रक्षकांनी चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, पोलिसांनी चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याला समज देवून सोडून दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.
रात्रीची गस्त घालण्याची मागणी
तीन दिवसांपूर्वी खारघर सेक्टर 36 मधील स्वप्नपूर्ती सोसायटीत रात्रीच्या वेळी प्रवेश करून सायकल तसेच महागडे चप्पल चोरी करून पलायन केल्याची घटना घडली. या विषयी नागरिकांकडे विचारणा केली असता, रात्रीच्या वेळी पोलिस गस्त घालत नसल्यामुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे.